नाती!
मला कधी कधी असं वाटतं की आपण सत्य, असत्य, आशा, अपेक्षा, आकांक्षा, योग्य, अयोग्य, यासारख्या अश्या कित्येक महत्वाकांक्षाच्या मागे धाव घेत असताना त्यात इतके गुरफटून जातो की नकळतच अस्तित्वाची पकड सुटत जाते. कित्येक निरगाठी सैल झाल्यावर अचानकपणे एका स्वप्नातून जागें झाल्याचा भास होतो. या काळात पुस्तकातील अनेक पाने वाचायची राहूनच गेलीत असे जाणवते. या काळात मग कित्येक गोष्टींची परिभाषा बदलली आहे असे वाटत असते. अश्या या काळात सगळ्यात जास्त होरपळली जातात 'नाती'. खरंच पाण्यासारखी नितळ ही नाती, मिळेल तो आकार घेणारी. समंजसपणे निरंतर प्रवास करणारी. वाटेतील सगळे खळगे भरणारी, तृष्णा मिटवणारी आणि सतत पुढे जाणारी. प्रसंगी रौद्र असलीतरी हवी हवी अशी वाटणारी. कधी कधी वाटतं, त्या नदीच्या प्रवाहाला वाटत नसेल का कुठेतरी थांबावं, एकदा मागे वळून बघावं? पण लक्षात आलं, प्रवाह सुरु झाला की तो कुठे खुंटणे कठीण. वाटलं तर दिशा बदलते, पण प्रवाह, छे , कधीच नव्हे. रात्रीच्या अंधारात काजव्यांचा प्रकाश एका वाटकरूला जेवढा पुरेसा वाटतो, तसंच नात्यांचा आधार अंतरीक्षा बाहेर पण जाण्याची हिम्मत देऊन जातो....