खेळ शब्दांचा !
इतक्यातली नवीन गोष्ट म्हणजे मी इथे येऊन मराठी लिटरेचरची खूप मोठी ‘फ्यान’ झाली आहे. मराठी तारकांची तर आधी पासून होतीच पण आता तर साहित्याची पण झाली आहे. इतकं सुंदर लिहून ठेवलय लोकांनी आणि ते पण अगदी साध्या शब्दांत. आता पु.ल.देशपांडेंचच बघा ना. भावनांची किती सहजतेनी मांडणी करतात ते. किती अभ्यास! पुस्तकी नव्हे, तो तर त्यांचा होताच, लोकांचा अभ्यास, त्यांच्या भावनांचा, त्यांच्या स्वभावाचा! शब्दांचा कसला कठीण अर्थ नाही, आहे तो फक्त शब्दांचा खेळ! जड जड शब्द वापरून तर कोणी पण लिहितं, पण तेच जर कठीण भावना सरळ सोप्या शब्दांत लिहा म्हंटलं तर ते किती जड जातं! आणि पु.ल. ते किती सहजतेने करतात! एका क्षणात हसवणं आणि एका क्षणांत रडवणं इतकं सफार्इदारपणे करतात की एका क्षणापुर्वी गालातल्या गालात हसणारे आपण असे कसे डोळे टिपून राहिलो आहोत किंवा इतके गंभीर कधी झालो कळतच नाही! खरच, असे लेखक आपल्या डोळयांसमोर एक जगच उभं करतात. अगदी जे.के.रॉलिंग सारखं. याचा अर्थ हा नाही की मला इंग्लिश नॉव्हेल वाचणं आता आवडत नाही, मला आता मराठी पुस्तकांची ओढ लागली आहे एवढच! आता जर मला कोणी मराठी पुस्तक वाचायला दिलं तर ते मी नक्कीच वाचीन आणि ‘बापरे, मराठी! हे संपवायला खूप दिवस लागतील’ हे नक्कीच म्हणणार नाही.
कदाचित हा बदल वरचेवर मराठी न वापरल्यामुळे झाला असावा. कारण कॉलेज मध्ये इंग्लिश आणि घरी हिंदीचा वापर होतो. यामुळे ‘मराठी विसरतेय की काय’ अशी भिती वाटून नकळतच मराठी वाचन सुरू झाले असावे.
आज एक अप्रतीम नाटक बघितलं - मी नथुराम गोडसे बोलतोय. (पहा नाटक भाग१, भाग२) कित्ती दिवसांपासून बघायचं राहिलं होतं. काय ते शब्द! खरच, ही शब्दांची दुनिया किती लाघवी! या शब्दांसोबत मला रमायला कधीपण आवडेल. बहुतांश खोटया असलेल्या जगात ही शब्दांच्या खऱ्या दुनियेतील साथ किती आनंद आणि आपलेपणा देऊन जाते! ते जगच किती वेगळं ना? शब्दांचा अर्थ, भावार्थ, दडलेला अर्थ, प्रासंगिक शब्द, किती ही विविधता! इतकी जादू करतात ते की आपण त्यात गुंतत जातो, त्या पात्रांच्या भोवताल जाऊन बसतो अगदी नकळतच! असं वाटतं की सगळी रंगीत तालीम आपल्या प्रत्यक्ष चाललेली आहे. त्यांच्यातला आनंद, दु:ख, प्रेम, राग, लोभ, भांडण सगळं आपल्यासोबत होतय असं वाटू लागतं आणि त्यालाच आपण काही वेळा करता खरं मानू लागतो. शब्दांत किती ही अलौकिक ताकद ना, जिच्यामुळे आपण त्या काल्पनिक जगात वास्तविकता शोधू लागतो! कित्येक वेळला स्वत:लापण त्या जागी ठेऊन बघतो! मग हे शब्द कुठलेही असो, एखादया पुस्तकातले, नाटकातले किंवा चित्रपटातले! त्यांच्यामुळे होणारा परिणाम एकच - अंतर्मुख होणे!
कारण शेवटी म्हणतातच ना -
# पु .ल च्या साहित्याच्या आवडलेल्या काही टिपणी इथे -
http://www.puladeshpande.org/
http://cooldeepak.blogspot.com/
http://www.puladeshpande.net/
Comments
Post a Comment