मी एक काइट रन्नर !




“मॅडम हे डी टी देशमुखचं गणिताचं पुस्तक. अगदी अप्रतीम. युनिवर्सिटीचा पेपर यातूनच येतो. हेच घ्या!”

नमस्कार! मी छोटू! तसं खरं नाव शेखर, पण सगळेच मला छोटू म्हणूनच ओळखतात! एका पुस्तकांच्या दुकानात काम करतो. मी एका मोठ्या शहाराच्या एका छोट्याशा वस्तीत राहतो. गावाकडे काम मिळत नसल्याने माझे वडील रोजगारासाठी इथे आले. त्यांच्यापाठोपाठ आम्ही सगळेच आलो. माझे आर्इ वडील मिळेल ते काम करतात आणि माझे व माझ्या लहान भावाचे हट्ट पुर्ण करतात. मी सगळयांसारखाच अत्यंत सामान्य. सगळया मुलांसारख्या छोट्या अपेक्षा असलेला. जोपर्यंत शक्य होतं तोपर्यंत मला आर्इ­वडिलांनी शिकवलं. शाळेत जाणं, अभ्यास करणं मला आवडत असलं तरी नार्इलाजास्तव मला शिक्षण सोडावं लागलं. पैसा कमवायला मला मग माझ्या छोट्याश्या जगातून भव्य अश्या जगात पडावं लागलं. पुस्तकांची आवड असल्याने मी एका जुनी पुस्तकं विकणाऱ्याकडे कामाला लागलो. मग फावल्या वेळात मी दुकानातलीच पुस्तकं वाचायला लागलो. आज नेहमीप्रमाणे दुकानात बसलो असता माझ्या नजरेस एक द कार्इट रनर नावाचं पुस्तक पडलं. पुस्तकाचं नाव वाचताच हे पुस्तक वाचण्याची मला एक अनामिक ओढ लागली, जणु माझा भुतकाळ मला बोलवत होता. पुस्तकातील कार्इट रनरच्या भावना मी समजू शकत होतो कारण काही काळापुर्वी मी तेच तर करायचो! फरक एवढाच की पुस्तकातील मुलगा आपल्या मित्राकरता धावायचा आणि मी माझ्याकरता! हो मी एक कार्इट रनर आणि मला स्वत:ला कार्इट रनर म्हणून घ्यायला आवडायचं की अजुनही आवडतं?

लहान होतो तेव्हा आर्इ मला आपल्या सगळया सणांबद्दल माहिती सांगायची. संक्रांत म्हणजे लोकांना जोडण्याचा सण. यात एकमेकांना गोड देऊन त्यांच्याशी नेहमी गोडीने राहण्याचं वचन देण्याचा सण. यावेळी सुर्य हा मकर राशीत जातो आणि तो उत्तरायणात संक्रमणास असतो. हा सगळा तपशिल ऐकताना माझे कधीच लक्ष नसायचे. माझे लक्ष तर आकाशात उडणाऱ्या त्या विविध रंगी पतंगांकडे असायचे! भव्य असे आकाश या छोट्या पतंगांनी लपून जायचे. किती विविध त्यांचे आकार, रंग! सुर्याला सुध्दा झाकतील अशी या सगळया पतंगांची हिम्मत! नकळतच मी या पतंगांकडे झुकत गेलो. तो पतंगीचा मांजा माझ्या बोटांना हवा हवासा वाटू लागला. मग काय. घरी पतंगीकरता पैसे हवे म्हणून हट्ट सुरू झाले. माझं पाहून माझ्या भा पण हट्ट करू लागला. शेवटी आम्हाला पैसे मिळाले पण यापुढे मिळणार नाहीत हे बजावूनच! आम्ही मग दोन पतंगा विकत घेतल्या. एक­एक पतंग उडवू असं आम्ही ठरवलं. पहिल्या पतंगीचं सुत्तर बांधतानाच ती फाटली! आणि दुसरी उडण्याच्या काही क्षणातच ओऽकाट झाली! आता नवीन पतंग नाही मिळणार हे माहित असल्यामुळे आम्ही दोघं हताश झालो आणि नुसते आकाशाकडे बघत बसलो.

एवढयातच माझा सगळयात जवळचा मित्र गोलू आला. आमची झालेली गोची त्याला सांगितली. गोलुला पण पतंग उडवायला फार आवडत. तो आम्हाला त्याच्या मित्रांसोबत पतंग उडवायला घेऊन गेला. मग पुढील काही दिवस असे मजेत गेले. आम्ही आणि आमची पतंग, बाकी काही विचारायलाच नको! थोड्या दिवसांनी पुन्हा तिच अडचण. आमच्या सगळया पतंगा संपल्या! कोणालाच पैसे मिळणार नव्हते. आता काय करायचं? दुकानदाराचे लक्ष नसताना पतंग लंपास करायची अशी योजना आम्ही आखली. आमच्यातील एक जण दुकानदाराला व्यस्त ठेवेल व दुसरा हळुच पतंग घेर्इल अशी आमची योजना होती! आणि हो दर वेळी नवीन दुकान आणि नवीन जोडी जेणेकरून कोणाच्या लक्षात नाही येणार! चोरलेल्या पतंगा उडवताना काय तो उत्साह असायचा! आम्ही मग एकमेकांत पतंग उडवण्याची स्पर्धा ठेवायचो. मी आणि गोलू नेहमीच प्रतिस्पर्धी असायचो! एकमेकांच्या खूप पतंगा कापायचो, त्यामुळे आमच्यांत नेहमी स्पर्धा असायची. नकळतच आमची मैत्री स्पर्धेमध्ये बदलू लागली. या नादात शाळेत जायला विसरायचो. फक्त मी सर्वश्रेष्ठ हेच आम्हाला दाखवायचं असायचं. त्यामुळे आम्हाला खुप पतंगा लागत असल्यामुळे हळुहळु आमचे पतंगा चोरण्याचे प्रमाण वाढत गेले व ते दुकानदारांच्या लक्षात ये लागले. आम्ही चोरण्यात पटार्इत झाल्यामुळे बिन्धास्त राहत होतो. पण एक दिवस आमची चोरी पकडली गेली आणि पतंग मिळण्याचा मार्ग बंद झाला.

आता याच्यावर उपाय म्हणून आम्ही कटलेल्या पतंगा पकडायचं ठरवलं. आम्ही मग सगळे धावू लागलो! इमारती, घरं, दुकानं, झाडं, रस्ते, रेल्वे, वाटेत जे येर्इल ते आम्ही पायाखाली तुडवत होतो. पायाखाली कशाचीच पर्वा नसत. आमचं ध्येय एकच ती कटलेली पतंग सर्वात प्रथम माझ्याच हाता येणार! ती कटून येणारी पतंग किती जोश द्यायची! तिला पकडायला आम्हाला धावण्यासोबतच ती कोणत्या दिशेने जार्इल, कधी पडेल यांचा ताळमेळ लावावा लागत असे. त्यासाठी सगळे रस्ते माहिती असावे लागत. घरचे कितीही रागवत असले तरी पतंग पकडण्यात किती आनंद असायचा! मी कोणतातरी मोठा पराक्रम केला असाच भास मला व्हायचा! पण मी आणि गोलूमध्ये पतंग पकडण्यातही स्पर्धा होतीच! ती फक्त कधी चिघळली आम्हाला कळले नाही! ती पतंग मिळवायला आमच्यात मारामारी पण होत. एकदा अशीच इतकी मारामारी झाली की आम्हाला रूग्णालयात न्यावं लागलं. त्या दिवसापासून आम्ही पक्के वैरी झालो. आमच्या मित्रांचेच दोन गट झाले आणि आम्ही एकमेकांना मारायलापण घाबरत नसू. घरचे आम्हाला समजवत पण आम्ही कोणाचच ऐकत नसत. एक दिवस मी, माझा भा आणि काही मित्र गच्च्यांवरून उडया मारत पतंग पकडायच्या नादात होतो. अचानक आम्हाला माझ्या भावाच्या ओरडण्याचा आवाज आला. तो खाली पडलेला दिसला आणि वर बघतो तर आमचे जुने मित्र तिथे उभे. सगळा प्रकार माझ्या लक्षात आला. मी समजून त्यांनी चुकून माझ्या भावाला धक्का दिला होता. ही स्पर्धा आमच्या जीवावर उठेल असे मला कधीच वाटले नव्हते. पडल्यामुळे माझा भाउ गंभीर जखमी झाला होता. माझ्या हव्यासामुळे तो जखमी झाला होता. अपराधी भावनेने माझे मन कळवळून उठले होते आणि त्यात भरीस भर म्हणजे आर्इ वडिलांचे उदासीन चेहरे. सगळ मला बोचत होतं. आपण किती चुकत होतो हे मला कळले. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा घातकच हे मला चांगल्याने कळले होते. कटलेल्या पतंगीप्रमाणे जीवन जगण्यापेक्षा जी पतंग सगळयात मोठया पेचातून सलामत सुटते तिच्याप्रमाणे जीवन जगण्यातच मजा असते हे मी ओळखले आणि स्वत:च्या पायांवर उभं राहायचं मी ठरवलं.

“भाउ ते शोभा देचं स्पीडपोस्ट आहे का?”

“ अ काय म्हणालात? हो आहे. आणतो. एक मिनिटं हं.”


Comments

Popular posts from this blog

Pink Boots!

Go and Live Your Life They Said!

Don’t know why!